भाग्यदर्शी लोखंडे

लोकदृष्टी | सामाजिक न्याय | इतिहास | राजकारण | विज्ञान-तंत्रज्ञान | विचारवंत

रविवार, ७ डिसेंबर, २०२५

आयुष्य म्हणजे एक अनियंत्रित नदी



आयुष्य म्हणजे एक अनियंत्रित नदी. कधी शांत सपाट वाहते, तर कधी खडकांवर आदळून तीव्र वेगाने पुढे धावते. कधी आपण तिच्या प्रवाहात सहज तरंगतो, तर कधी तिच्या लाटांशी झुंज देताना श्वास गुदमरतो. चढउतार हे आयुष्याचे खरे स्वरूप आहे. हे चढउतार तेव्हाच जाणवतात जेव्हा आपण खोल खोल दरीतून वर येतो आणि मग अचानक समोर उंच शिखर दिसते. तिथे पोहोचल्यावर मागे वळून बघितले की लक्षात येते की, खाली पडल्याशिवाय वर चढता येत नाही.


जगातल्या सगळ्यात यशस्वी, थोर मानल्या जाणाऱ्या व्यक्तींनीही आयुष्यात प्रचंड मोठे अपयश, निराशा, अपमान अनुभवले आहेत. पण त्यांनी त्या अपयशाला शेवट मानले नाही, ते फक्त एक पायरी मानली. त्यांची उदाहरणे आपल्याला शिकवतात की खरा विजय हा पडल्यानंतर पुन्हा उभे राहण्यातच आहे.

थॉमस अल्वा एडिसन यांनी विद्युत बल्ब शोधण्यासाठी १०,००० वेळा प्रयोग केले आणि अपयश पचवले. पत्रकारांनी विचारले, “१०,००० वेळा अपयश का पचवले?” एडिसन हसले आणि म्हणाले, “मी १०,००० वेळा अपयश पचवले नाही. मी फक्त १०,००० मार्ग शोधले की बल्ब कसा बनत नाही.” एका रात्री त्यांच्या संपूर्ण लॅबला आग लागली. सगळे आयुष्यभराचे संशोधन राख झाले. वयाच्या ६७ व्या वर्षी ते संकट आले. पण दुसऱ्याच दिवशी एडिसन म्हणाले, “आता नव्याने सुरुवात करू.” त्या आगीतूनच त्यांनी फोनोग्राफचा शोध लावला. आज आपण ज्या बल्बाच्या प्रकाशात वाचतो, तो प्रकाश त्या १०,००० अपयशांतून आणि एका प्रचंड आगीतून जन्माला आला.

जे. के. रोलिंग - हॅरी पॉटरची लेखिका. १९९४ साली ती एकटीच, घटस्फोटित, बेरोजगार व एका मुलीची आई होती. ती सरकारच्या मदतीवर जगत होती. तिच्या जवळ फक्त एक जुना टाइपरायटर आणि हॅरी पॉटरची कल्पना होती. त्यांनी सुरुवातीला हॅरी पॉटरची हस्तलिखिते १२ प्रकाशकांना पाठवली. सगळ्यांनी नकार दिला. १२ वे प्रकाशक ब्लूम्सबरी यांनी स्वीकारले, पण त्यांनी तिला सांगितले, “बालसाहित्यात फार पैसे नाहीत, नोकरी शोध.” त्या पुस्तकाच्या आजपर्यंत ५०० दशलक्षाहून जास्त प्रती विकल्या गेल्या आहेत आणि रोलिंग जगातील सर्वात श्रीमंत लेखिकांपैकी एक आहे. पण त्या यशापर्यंतचा प्रवास हा नैराश्य, एकटेपणा आणि नकाराचा होता.

ऑप्रा विन्फ्रे - आजची अब्जाधीश, प्रभावशाली मीडिया राणी. लहानपणी तिला तिच्या नात्यातल्या माणसांकडून लैंगिक छळ सहन करावा लागला. ती गरीब कृष्णवर्णीय कुटुंबात वाढली. १४ वर्षांची असताना ती गरोदर राहिली आणि तिचे मूल जन्मानंतर लगेच मेल्याने तिला प्रचंड मानसिक आघात झाला. टीव्ही करिअरच्या सुरुवातीला तिला एका टॉक शोमधून काढून टाकण्यात आले. कारण ती “टीव्हीसाठी योग्य दिसत नाही” असे तिला सांगण्यात आले. पण तिने हार मानली नाही. आज ती जगातील सर्वात प्रभावशाली स्त्री मानली जाते. तिच्या आयुष्यातील सगळ्यात अडचणीच्या काळानेच तिच्यात प्रचंड जिद्द पेरली. 

भारतीय उद्योगपती अब्जाधीश धीरूभाई अंबानी यांची कहाणी तर आपल्याला माहितीच आहे. ते एका पेट्रोल पंपावर काम करत होते. १९५८ साली त्याच्याकडे त्यांच्याकडे फक्त ५०० रुपये होते. त्यांनी रिलायन्सची सुरुवात एका छोट्या खोलीतून केली. १९७७ साली रिलायन्सचा IPO आला तेव्हा बाजारात प्रचंड विरोध होता. अनेकांनी त्यांना हिणवले. १९८६ साली त्यांना पक्षाघात झाला, डावे अंग पूर्णपणे निकामी झाले. डॉक्टरांनी सांगितले, आता व्यवसाय सोडा. पण धीरूभाईंनी मुकेश आणि अनिल यांच्या मदतीने रिलायन्सला जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक बनवले. आज रिलायन्सची मार्केट कॅप २४ लाख कोटींच्या वर आहे. ही उंची त्यांना पक्षाघात, अपमान आणि असंख्य संकटांतूनच मिळाली. 

या सगळ्या व्यक्ती एकच गोष्ट शिकवतात ती म्हणजे, चढउतार हे आयुष्याचा भाग आहेत, अपवाद नाहीत. आपण खाली कोसळतो, तेव्हा आपल्यापुढे दोनच पर्याय असतात, तिथेच पडून राहणे किंवा पुन्हा उभे राहणे. जे पुन्हा उभे राहतात, त्यांचेच आयुष्य यशाच्या शिखरावर पोहोचते. 

मी स्वतःही असे अनेक खड्डे पाहिले आहेत. २०१६ सालच्या आजाराने मी उद्ध्वस्त झालो होतो. पण एक दिवस लक्षात आले, मी असाच पडून राहिलो तर आयुष्याचा अर्थच संपेल. या दुखण्याने मला खूप काही शिकवले. हसणे, स्वप्न बघणे, माणसे जोडणे. मी पुन्हा लिहायला, बोलायला सुरुवात केली. आज मी जे काही करतो, ते त्या दुःखातूनच जन्माला आले आहे. दुःख हे रोपाला दिल्या जाणाऱ्या खतासारखे असते. ते आपल्याला नवनिर्माणासाठी ताकद देते. 

आयुष्यात खूप वाईट झाले की आपण विचार करतो, “आता यापेक्षा वाईट काय होणार?” पण जेव्हा चांगले घडते तेव्हा आपण विचार करतो, “हे खरेच घडत आहे ना?” आपण दुःखाला फार गंभीरपणे घेतो आणि सुखाला क्षणभंगुर. पण खरे तर दोन्ही क्षणिक आहेत. फक्त दुःख आपल्याला आयुष्याचा धडा शिकवते आणि सुख आधार देते.

आज तुम्ही कुठल्याही दरीत अडकला असाल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ही दरीच यशाच्या शिखराकडे नेईल. फक्त पडून राहू नका. पुन्हा उभे राहा. पुन्हा चालायला लागा. कारण ज्या क्षणी तुम्ही पुन्हा चालायला लागता, त्या क्षणी तुमचे आयुष्य पुन्हा नव्याने लिहिले जाऊ लागते.

आणि जेव्हा तुम्ही शिखरावर पोहोचाल, तेव्हा मागे वळून बघा. तुम्हाला दिसेल, तुम्ही ज्या खड्ड्यातून वर आलात, तेथूनच तुमच्या पंखांना नवा आकार मिळाला होता. आयुष्य चढउतारांचे असले तरी हेच चढउतार आपल्याला नवी भरारी घेण्यास शिकवतात. 


0+ WhatsApp Great

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा